औरंगाबाद : टाळ, मृदुंगाच्या गजरात भक्तांनी नाथ महाराजांचा गजर करत आज सकाळी औरंगपुरा परिसरात पालखी काढण्यात आली. यावेळी भजन, भारुड म्हणत भक्तांनी नाथांचा गजर केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
नाथषष्ठी निमित्ताने आज औरंगपुरा येथील संत एकनाथ मंदीरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर नाथांची पालखी काढण्यात आली. टाळ, मृदुंग चा गजर करत, पारंपरिक पद्धतीने पाऊली खेळत पालखी निघाली. यावेळी भजनी मंडळीनी यात सहभाग नोंदवून नाथ महाराजांचे भजन म्हणत नाथांचा जयघोष केला. ही पालखी औरंगपुरा नाथमंदिर ते शहागंज, सिटी चौक, संस्थान गणपती मंदिर, मच्छली खडक, सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी मार्गे औरंगपुरा नाथ मंदिर मार्गे काढण्यात आली. त्यानंतर नाथांचा लघुरुद्राभिषेक करून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 16 तारखेला 30 पोते लाह्या, 2 क्विंटल दह्याचा काला बनवून भक्तांना वाटप करण्यात येणार असल्याचे संत एकनाथ मंदिर विश्वस्त मंदिराचे व्यवस्थापक सोमनाथ शेलार यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष एड. सदानंद देवे, सचिव लक्ष्मण थोरात, सहसचिव विष्णू जाधव, सचिन वाळके, रायभान पाटील, सतीश म्हस्के, गोपाल कुलकर्णी, नारायण कानकाटे, गणेशराव घुगे, गंगाधर महाराज घुगे सह आदींनी सहकार्य केले.